उत्तराखंडच्या हल्दवानी जिल्ह्यातीन बनभूलपुरा येथे ८ फेब्रुवारी रोजी हिंसाचाराची घटना घडली होती. या हिंसाचाराचा मास्टरमाइंड अखेर आज पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. उत्तराखंड पोलिसांचे प्रवक्ते आयजी निलेश भारणे यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेतला मुख्य आरोपी मास्टरमाइंड अब्दुल मलिक याला पोलिसांनी अटक केली आहे. मलिक या हिंसाचारानंतर फरार होता आणि त्याचा शोध पोलिसांच्या अनेक पथकांकडून घेणे सुरू होते.
आरोपी अब्दुल मलिक याने हल्दवानीच्या सेशन कोर्टात अंतरीम जामीनासाठी याचिका देखील दाखल केलेली आहे, यावर २७ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. मात्र यापूर्वीच दिल्ली पोलीसांनी त्याला दिल्लीतून अटक केली आहे. आरोपीच्या वकीलांनी सांगितले की मलिक याचा हिंसाचाराशी काहीही संबंध नाही. जेव्हा हा हिंसाचार झाला त्याच्या तीन-चार दिवसांआधीपासून तो हल्दवानीत नव्हता.
उत्तराखंड येथील हल्दवानी शहरात ८ फेब्रुवारी रोजी अवैधरित्या बांधण्यात आलेले मशिद आणि मदरसे तोडल्यानंतर हिंसाचार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. बुलडोझर कारवाई करण्यात आल्याने पोलिस प्रशासनावर जोरदार दगडफेक करण्यात आली. तसेच यावेळी अनेक वाहने देखील पेटवण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. दंगलखोरांनी बांभूळपुरा पोलीस ठाण्याला चारही बाजूंनी घेरत दगडफेक केली होती. दंगलखोरांनी मदरसा पाडण्यासाठी वापरलेल्या बुलडोझरचीही तोडफोड केली.अनेक वाहने जाळली.या हिंसाचारात 4 जणांचा मृत्यू झाला, तर 300 च्य आसपास जखमी झाल्याची माहिती समोर आली होती.