पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वारका, गुजरातमध्ये भारतातील सर्वात मोठ्या केबल-स्टेड ब्रिजचे उद्घाटन केले आहे. सुदर्शन सेतू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मोठ्या पुलाचे उद्घाटन केल्यानंतर पीएम मोदींनी बेट द्वारका जी मंदिरालाही भेट दिली. बेट द्वारका मंदिरात त्यांनी पुजा केली. गुजरातमधील ओखा आणि बेयट द्वारका बेटांना जोडणारा ‘सुदर्शन सेतू’ 979 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. ऑक्टोबर 2017 मध्ये 2.3 किमी लांबीच्या पुलाची पायाभरणी करताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, हा पूल जुन्या आणि नवीन द्वारका यांच्यातील दुवा म्हणून काम करेल.
‘सिग्नेचर ब्रिज’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पुलाचे नाव आता ‘सुदर्शन सेतू’ किंवा सुदर्शन पूल असे करण्यात आले आहे. तसेच बेयट द्वारका हे द्वारका शहरापासून सुमारे 30 किमी अंतरावर ओखा बंदराजवळ एक बेट आहे, जिथे भगवान कृष्णाचे प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिर आहे.
दरम्यान, एका मोठ्या सभेला संबोधित करण्यापूर्वी PM मोदी द्वारकाशीश मंदिरात प्रार्थना देखील करणार आहेत. तसेच पंतप्रधान आज दुपारी राजकोटमध्ये गुजरातच्या पहिल्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) चे उद्घाटन करणार आहेत. राजकोट एम्स व्यतिरिक्त पंतप्रधानांच्या हस्ते आंध्र प्रदेश ते पंजाब, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये नव्याने बांधलेल्या चार एम्सचे उद्घाटनही होणार आहे.