पुणे पोलिसांनी देशातील सर्वात मोठ्या ड्रग्स रॅकेटचा खुलासा केला आहे. अशातच आता पुण्यातील आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात तरूणाई मोठ्या प्रमाणात ड्रग्सच्या आहारी गेल्याचे दिसत आहे. याबबातचाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे ज्यात दोन तरूणींनी ड्रग्स घेतल्याचे दिसत आहे. पुण्याला हादरवून सोडणारा हा व्हिडीओ मराठी अभिनेते रमेश परदेशी म्हणजेच पिट्या भाई यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
रमेश परदेशी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ वेताळ टेकडीवरचा असून यामध्ये दोन महाविद्यालयीन तरूणी नशेत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगी नशेत बडबड करताना दिसत आहे तर दुसरी मुलगी बेशुद्ध अवस्थेत दिसत आहे.
हा व्हिडीओ शेअर करत रमेश परदेशी यांनी संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, आम्ही वेताळ टेकडीवर पळायला आलो होतो. त्यावेळी इथे महाविद्यालयात पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या दोन तरूणी बियर आणि नशेचं काहीतरी घेऊन टेकडीच्या कोपऱ्यात पडल्या होत्या. त्यानंतर आम्ही त्या दोघींना इथे सेफ जागी घेऊन आलो. मी आज हे यासाठी सांगत आहे कारण पुण्यात 2 दिवसांपूर्वी चार हजार कोटींचे ड्रग्स सापडले आहे. त्यात शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे हे आता नशेचे माहेरघर होत आहे का? याचा सर्वांनी गंभीरपणे विचार करायला हवा.
https://www.instagram.com/reel/C3vW1mcSc7t/?utm_source=ig_web_copy_link
याकडे आपण एक सजग नागरिक, पालक, भाऊ, बहिण म्हणून गांभीर्याने बघणार आहोत की नाही. पु्ण्यातील टेकड्यांवर लोक आपले शरीर सांभाळण्यासाठी येतात आणि इथे ही तरूण मुले मुली अशा प्रकारे नशा करतात. आई-वडिलांनाही माहिती नसते की आपली मुले नक्की काय करतात, असे म्हणत रमेश परदेशी यांनी पालकांना हे प्रकरण गांभीर्याने घेण्याचे आवाहन केले.