यवतमाळमधून मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी उभारण्यात येणार सभामंडप कोसळल्याची घटना घडली आहे. हा सभामंडप कोसळल्यामुळे चार कामगार जखमी झाले आहेत.
पंतप्रधान मोदी 28 फेब्रुवारीला यवतमाळ दौऱ्यावर येणार आहेत. तसेच तेथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी भारी गावामध्ये 45 एकर जागेवर मोठा सभामंडप उभारण्यात येत आहे. यावेळी या मंडपाचा एक डोम उभा करण्याचे काम सुरू असताना पिल्लर जमिनीतून निखळला. त्यामुळे त्याचे खांब क्रेनवर कोसळले, त्यावेळी खाली काही कामगार होते. या घटनेत चार कामगार जखमी झाले असून सुदैवाने अन्य कामगार बचावले आहेत. सध्या जखमी कर्मचाऱ्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
भारी गावामध्ये महिला बचत गटाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते दोन लाखांहून अधिक बचत गटाच्या महिलांना संबोधित करणार आहेत.