भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी छोटे पक्ष संपवा अशा आशयाचे वक्तव्य केल्याच्या काही बातम्या प्रसार माध्यमांनी लावल्या होत्या. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंवर विरोधकांकडून टीका करण्यात आली. तर आता यावरून बावनकुळे चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिले आहे.
यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, लहान पक्षांना सोबत घेऊन आम्ही काम करतो. आम्ही लहान पक्षांचा सन्मान करतो. उलट शरद पवार हे लहान पक्षांना संपवतात. विरोधकांना काही कामे राहिली नाहीयेत. तसेच ज्या पत्रकारांनी ही खोटी बातमी छापली आहे त्यांना मी नोटीस देणार आहे, असा इशारा बावनकुळेंनी दिला आहे.
मी असे म्हणालो होतो की, भाजपमध्ये जे येण्यास उत्सुक आहेत त्यांना पक्षामध्ये घ्या. मी कार्यकर्त्यांना सांगितले की, नव्या कार्यकर्त्यांना सोबत घ्या. तसेच जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मान करा. आम्ही छोट्या पक्षांना कायम सन्मान केला आहे, असे बावनकुळेंनी सांगितले.
पंतप्रधान मोदींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे. या संकल्पाला साथ देण्यासाठी पक्ष प्रवेश होत आहेत. येत्या 27 तारखेलाही मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणार आहेत, असेही बावनकुळे म्हणाले.