आज मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महत्त्वाची बैठक घेतली. यावेळी त्यांनी समाजाला संबोधित करताना उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. मराठ्यांना संपवण्याचा कुणाचातरी डाव आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा हात आहे, असा गंभीर आरोप मनोज जरांगेंनी केला आहे.
यावेळी मनोज जरांगे म्हणाले की, मी माझ्या समाजासाठी काम केले तर काय चूक केली. मला संपवण्याचा देवेंद्र फडणवीसांचा डाव आहे. मी सागर बंगल्यावर येतो. माझा बळी त्यांना हवा आहे. तसेच मराठ्यांमध्ये आणि गरीब ब्राह्मणात वाद निर्माण केला जात आहे, असे गंभीर आरोप जरांगेंनी केले आहेत.
मी छत्रपतींची शपथ घेऊन सांगतो, मी कोणत्याही पक्षाचा नाही. मला कोणत्याही पक्षाकडून मदत मिळत नाही. मी कोणत्याही पक्षाचा नसून मी फक्त माझ्या समाजाचा आहे. मराठ्यांना संपवण्याचा कुणाचातरी डाव आहे. यात देवेंद्र फडणवीसांचा हात आहे, मराठ्यांना मराठ्यांच्या हातूनच हरवण्याचा त्यांचा डाव आहे, असा आरोपही जरांगेंनी केला.
पुढे ते म्हणाले, फडणवीस मला ब्राह्मणी कावा दाखवत आहेत. ते काय चिज आहेत हे मला माहिती आहे. आज अनेक नेते भाजपमध्ये का येत आहेत. अजित पवार, छगन भुजबळ हे कधीच राष्ट्रवादी सोडू शकत नाहीत. तसेच एकनाथ शिंदे हे शिवसेना आणि अशोक चव्हाण हे काँग्रेस कधीच सोडू शकत नाहीत. पण, फडणवीसांच्या काव्यामुळे या नेत्यांना पक्ष सोडावा लागला, असेही जरांगे म्हणाले.
मला सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न होता, त्यामुळे मी सलाईनही घेणे सोडून दिले आहे. जर फडणवीसांच्या मनात असते तर लगेच सगेसोयऱ्याचा निर्णय झाला असता, अशी टीकाही जरांगेंनी केली.