लक्षद्वीपमध्ये खोल समुद्रात डुबकी मारल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी गुजरातच्या द्वारका येथील समुद्रात डुबकी मारली. पाण्याखाली जाऊन पंतप्रधान मोदींनी द्वारका शहर ज्या ठिकाणी बुडाले आहे त्या ठिकाणी प्रार्थना केली.
या धार्मिक डुबकीनंतर पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये आपला अनुभव देशवासियांसोबत शेअर केला. द्वारका या जलमग्न शहरात प्रार्थना करणे हा एक दिव्य अनुभव असल्याचे ते म्हणाले. मला अध्यात्मिक भव्यता आणि शाश्वत भक्तीच्या प्राचीन युगाशी जोडले गेले आहे. भगवान श्रीकृष्ण आपल्या सर्वांचे कल्याण करोत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पीएम मोदींच्या जलमग्न शहराच्या दौऱ्याकडे सागरी पर्यटनाला चालना देण्याचा एक मार्ग म्हणून पाहिले जात आहे. एकेकाळी समृद्ध शहर असलेली द्वारका शतकानुशतके समुद्रात बुडाल्याचे मानले जाते. तसेच स्कूबा डायव्हिंग द्वारकाच्या किनाऱ्याजवळ बेयट द्वारका बेटावर केले जाते, जेथे पुरातत्वशास्त्रज्ञांनी उत्खनन केलेले प्राचीन द्वारकेचे पाण्याखालील अवशेष लोकांना पाहता येतात.
आज, ऐतिहासिक आणि अध्यात्मिक महत्त्व असलेल्या ठिकाणी प्रार्थना करण्यासाठी पंतप्रधान मोदी समुद्रात उतरतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये पीएम मोदींच्या कमरेभोवती अनेक मोराची पिसे जी श्रीकृष्णाला खूप प्रिय आहेत ती बांधलेली दिसत आहेत.
दरम्यान, आज सकाळी पंतप्रधानांनी गुजरातच्या देवभूमी द्वारका जिल्ह्यातील बेयट द्वारका बेटाला ओखा मुख्य भूमीशी जोडणाऱ्या अरबी समुद्रावरील 2.32 किमी लांबीच्या ‘सुदर्शन सेतू’ या देशातील सर्वात लांब केबल-स्टेड पुलाचे उद्घाटन केले.