आज मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मराठ्यांना संपवण्याच कुणाचातरी डाव आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा हात आहे, असा गंभीर आरोप मनोज जरांगेंनी केला आहे.
मी माझ्या समाजासाठी काम केले तर काय चूक केली. माझा जीव घ्यायचा आहे तर घ्या. मी सागर बंगल्यावर येतो. माझा बळी त्यांना हवा आहे. तसेच मराठ्यांमध्ये आणि गरीब ब्राह्मणात वाद निर्माण केला जात आहे, असे गंभीर आरोप जरांगेंनी केले आहेत.
मला सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न होता, त्यामुळे मी सलाईनही घेणे सोडून दिले आहे. जर फडणवीसांच्या मनात असते तर लगेच सगेसोयऱ्याचा निर्णय झाला असता, अशी टीकाही जरांगेंनी केली आहे. जरांगेंनी केलेल्या या आरोपांनंतर भाजप नेते संतापले आहेत.
भाजप नेते नितेश राणे यांनी मनोज जरांगेंवर हल्लाबोल करत त्यांना इशारा दिला आहे. आमच्या नेतृत्वावर मनोज जरांगेंनी बोलू नये. संपूर्ण राज्याला माहिती आहे की, सगळ्यात आधी फडणवीसांनीच मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. तरीही जरांगे फडणवीसांवर आरोप करत आहेत. हे चुकीचे आहे, जरांगेंनी फडणवीस यांच्याविरोधात बोलू नये. नाहीतर आम्हीही मराठा आहोत, आम्हीही दाखवून देऊ, असा इशारा नितेश राणेंनी दिला.
पुढे ते म्हणाले, मला विचार पडला आहे की, मनोज जरांगेंना स्क्रिप्ट कोण देते? त्यांच्या स्क्रिप्टला तुतारीचा वास येत आहे. मनोज जरांगेंचा लढा हा मराठा आरक्षणासाठी आहे की फडणवीसांना टार्गेट करण्यासाठी? त्यांनी मराठा समाजापर्यंतच आदोलन करावे. जर मनोज जरांगे सागर बंगल्यावर येणार आहेत तर आम्ही काय गप्प बसणार आहे का? सागर बंगल्यावर येण्याआधी आमची भिंत आहे ती आधी क्रॉस करून दाखवा, मग पुढचे पुढे बघू, असेही नितेश राणे म्हणाले.