मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मराठ्यांना संपवण्याच कुणाचातरी डाव आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा हात आहे. मी माझ्या समाजासाठी काम केले तर काय चूक केली. मला संपवण्याचा देवेंद्र फडणवीसांचा डाव आहे. मी सागर बंगल्यावर येतो. तसेच मराठ्यांमध्ये आणि गरीब ब्राह्मणात वाद निर्माण केला जात आहे, असे गंभीर आरोप जरांगेंनी केले आहेत.
मला सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न होता, त्यामुळे मी सलाईनही घेणे सोडून दिले आहे. जर फडणवीसांच्या मनात असते तर लगेच सगेसोयऱ्याचा निर्णय झाला असता, अशी टीकाही जरांगेंनी केली आहे. तसेच फडणवीसांवर टीका केल्यानंतर जरांगे आक्रमक झाले असून ते देवेंद्र फडणवीसांच्या मुंबईतील सागर बंगल्याकडे निघाले आहेत. यावेळी समाजातील लोकांनी जरांगेना शांत करत त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, जरांगेंनी केलेल्या गंभीर आरोपांवर आता देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस हे आज सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथील आंधरी धरणावर आले होते. त्यावेळी माध्यमांनी त्यांना जरांगेंनी केलेल्या गंभीर आरोपांबाबत प्रश्न विचारले. त्यावर फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देत बोलणे टाळले. मनोज जरांगे काय बोलले ते मी ऐकलेच नाही, त्यामुळे मी कशा कशाला उत्तर देऊ, असे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांवर टीका केल्यानंतर भाजप नेते नितेश राणे यांनी मनोज जरांगेंवर हल्लाबोल करत त्यांना इशारा दिला आहे. आमच्या नेतृत्वावर मनोज जरांगेंनी बोलू नये. संपूर्ण राज्याला माहिती आहे की, सगळ्यात आधी फडणवीसांनीच मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. तरीही जरांगे फडणवीसांवर आरोप करत आहेत. हे चुकीचे आहे, जरांगेंनी फडणवीस यांच्याविरोधात बोलू नये. नाहीतर आम्हीही मराठा आहोत, आम्हीही दाखवून देऊ, असा इशारा नितेश राणेंनी दिला.
पुढे ते म्हणाले, मला विचार पडला आहे की, मनोज जरांगेंना स्क्रिप्ट कोण देते? त्यांच्या स्क्रिप्टला तुतारीचा वास येत आहे. मनोज जरांगेंचा लढा हा मराठा आरक्षणासाठी आहे की फडणवीसांना टार्गेट करण्यासाठी? त्यांनी मराठा समाजापर्यंतच आदोलन करावे. जर मनोज जरांगे सागर बंगल्यावर येणार आहेत तर आम्ही काय गप्प बसणार आहे का? सागर बंगल्यावर येण्याआधी आमची भिंत आहे ती आधी क्रॉस करून दाखवा, मग पुढचे पुढे बघू, असेही नितेश राणे म्हणाले.