पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीतील भारत मंडपम येथे भारत टेक्स-2024 चे उद्घाटन करणार आहेत. हा देशातील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा टेक्सटाईल इव्हेंट आहे.
सोमवार ते गुरुवार या कालावधीत भारत टेक्स-2024 चे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधानांच्या 5F व्हिजनपासून प्रेरणा घेऊन, या कार्यक्रमात फायबर, फॅब्रिक आणि फॅशन फोकसच्या माध्यमातून परदेशातील बाजारपेठांपर्यंत एकात्मिक दृष्टीकोन आहे, ज्यामध्ये संपूर्ण कापड मूल्य शृंखला समाविष्ट आहे, असे पंतप्रधान कार्यालयाने रविवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
आज सकाळी 10.30 वाजता पंतप्रधान मोदी या कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत. तसेच चार दिवसांच्या या कार्यक्रमात 65 हून अधिक ज्ञान सत्रे असतील ज्यात 100 पेक्षा जास्त जागतिक पॅनेल या क्षेत्राशी संबंधित विविध समस्यांवर चर्चा करणार आहेत. सोबतच या कार्यक्रमात एक ‘इंडी हाट’; भारतीय कापडाचा वारसा, टिकाऊपणा आणि जागतिक डिझाइन अशा विविध थीमवर फॅशन सादरीकरणे होणार आहेत.
भारत TEX – 2024 मध्ये विद्यार्थी, विणकर, कारागीर आणि कापड कामगार तसेच धोरणकर्ते आणि जागतिक सीईओ, 3,500 हून अधिक प्रदर्शकांचा सहभाग असणार आहे. याशिवाय या कार्यक्रमात 100 हून अधिक देशांतील तीन हजारांहून अधिक खरेदीदार आणि 40,000 हून अधिक व्यापाऱ्यांचा सहभाग अपेक्षित आहे.