काल (26 फेब्रुवारी) मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. मराठ्यांना संपवण्याचा कुणाचातरी डाव आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा हात आहे, असा गंभीर आरोप मनोज जरांगेंनी केला आहे. तसेच हे गंभीर आरोप करत आता जरांगे फडणवीसांच्या मुंबईतील सागर बंगल्याच्या दिशेने रवाना झाले होते. जरांगेंच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात थेट संचारबंदी लागू करण्याचे आदेश काढले आहेत.
प्रशासनाच्या या निर्णयानंतर आता अंबड तालुक्यात मराठा आंदोलकांना मनाई असणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या जरांगे हे भांबेरा गावात असून तेथे मोठ्या संख्येने मराठा आंदोलक एकत्रित येत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.
जालना जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात म्हटले की, मनोज जरांगे पाटील हे 10 फेब्रुवारीपासून अंतरवाली सराटी येथे सगेसोयरे कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी उपोषण करत आहेत. जरांगेंच्या या मागणीस पाठींबा देण्यासाठी जिल्ह्यातील विविध भागांमध्ये आंदोलन आणि उपोषण सुरू आहेत. सगेसोयरे अधिसुचनेचे कायद्यात रूपांतर करण्याच्या मागणीसाठी 24 फेब्रुवारीला संपूर्ण जालना जिल्ह्यात 60 ते 65 ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. तसेच जरांगेंनी 25 फेब्रुवारीला आंदोलनाची पुढची दिशा ठरविण्यासाठी घेतलेल्या बैठकीत यापुढील आंदोलन मुंबईत करण्यात असल्याचे जाहीर केले आहे.
मनोज जरांगेंच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आणि जरांगेंनी मुंबईला जावू नये यासाठी अंतरवली सराटी येथे मोठ्या प्रमाणाच गर्दी जमण्याची शक्यता आहे. त्यामुळे धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग व तालुक्यातील इतर मार्गांवर गर्दीमुळे सार्वजनिक शांतता बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंबड तालुक्यात संचारबंदीचे आदेश लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.