काल मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीदरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मराठ्यांना संपवण्याचा कुणाचातरी डाव आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा हात आहे, असा गंभीर आरोप मनोज जरांगेंनी केला. त्यावर विरोधी पक्षातील नेते, आमदार, सत्ताधारी पक्षातील आमदारांनी आपापली मते माध्यमांसमोर मांडली आहेत. भाजपा आमदार नितेश राणेंनी देखील माध्यमांशी बोलताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे.
जरांगे पाटलांनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांवर बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले, ”आमची लढाई मराठा समाजाशी नाही. आम्ही सर्वजण मराठा समाजाच्या सोबत आहोत. पण एक व्यक्ती मराठा समाजाला वेठीस धरत असेल, मराठा समाजची बदनामी करत असेल तर ते आमचा समाज कधीही खपवून घेणार नाही. त्यांच्या अवतीभवती असलेल्या तरुण मुलांना देखील माझे सांगणे आहे की, उगीचच अंगावर केसेस घेऊ नका. नंतर गुन्हे मागे घेण्यासाठी कोणीही येत नाहीत. शिव्याशाप देण्याची हिम्मत ते करत आहे ते कोणाच्या जोरावर करत आहेत? तोंडातून तुतारी वाजवण्याचे काम होतंय का? हे सर्व कधी ना कधी स्पष्ट झाले पाहिजे. आमचे महायुतीचे सरकार सर्व समाजाबरोबर आहे. जरांगे पाटील फक्त देवेंद्र फडणवीसांवरच का टीका करतात? राजकीय आंदोलनाला आम्ही कोणीही पाठिंबा देणार नाही. ”
दरम्यान काल मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झाले होते. मनोज जरांगे म्हणाले की, मी माझ्या समाजासाठी काम केले तर काय चूक केली. मला संपवण्याचा देवेंद्र फडणवीसांचा डाव आहे. मी सागर बंगल्यावर येतो. माझा बळी त्यांना हवा आहे. तसेच मराठ्यांमध्ये आणि गरीब ब्राह्मणात वाद निर्माण केला जात आहे, असे गंभीर आरोप जरांगेंनी केले आहेत. मी छत्रपतींची शपथ घेऊन सांगतो, मी कोणत्याही पक्षाचा नाही. मला कोणत्याही पक्षाकडून मदत मिळत नाही. मी कोणत्याही पक्षाचा नसून मी फक्त माझ्या समाजाचा आहे. मराठ्यांना संपवण्याचा कुणाचातरी डाव आहे. यात देवेंद्र फडणवीसांचा हात आहे, मराठ्यांना मराठ्यांच्या हातूनच हरवण्याचा त्यांचा डाव आहे, असा आरोपही जरांगेंनी केला.