मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटीला यांच्यावर त्यांचे आंदोलनातील एकेकाळचे सहकारी अजय महाराज बारसकर यांनी सडकून टीका केली आहे. मनोज जरांगे हे चिटर आहेत. त्यांनी संभाजी राजेंनाही सोडले नाही. त्यांनी नाटकातील पैसे खाल्ले. तसेच आत्तापर्यंत झालेल्या आत्महत्यांना कोण जबाबदार आहे, असा सवालही अजय महाराज बारसकरांनी उपस्थित केला.
काल तुम्ही रागाच्या भरात उठले आणि तमाशा केला. त्यामुळे सर्व मराठा समाजाचा अपमान झाला आहे. आत्तापर्यंत तुमच्यावर एकाही नेत्याने टीका केली नव्हती. पण आता तुमच्यावर प्रचंड टीका होऊ लागली आहे. हा तुमचा अपमान नसून तुमच्या पाठीमागे असणाऱ्या सर्व समाजाचा अपमान आहे, असे अजय बारसकर म्हणाले.
पुढे ते म्हणाले, मनोज जरांगे तुम्ही पेटवणारे आहात तर आम्ही विझवणारे आहोत. तुम्ही तोडणारे आहात तर आम्ही जोडणारे आहोत. तुम्ही झुंडशाहीचे समर्थक आहात तर आम्ही कायद्याचे अन् संविधानाचे समर्थक आहोत.
जरांगेंनी माझ्यावर आरोप केले आहेत, त्यामुळे त्यांनी माझी माफी मागितली पाहिजे होती. पण त्यांनी माफी मागितली नाही. माझ्या एका प्रश्नाचे उत्तर दिले नाही. तुम्ही लोणावळा, वाशी येथे तुम्ही पारदर्शकता भंग केली. मला धमक्या, शिव्या देत जीवे मारण्यासाठी प्रयत्न केले. पण समाज माझ्या भूमिकेशी सकारात्मक आहे. जरांगेंनी माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत. तसेच कालचा प्रकार तमाशा होता, नेतृत्व कसे नसावे हे काल दिसले आहे, अशी टीकाही बारसकरांनी केली.