काल (25 फेब्रुवारी) मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर अनेक सत्ताधाऱ्यांनी मनोज जरांगेंवर टीका केली आहे. यामध्ये आता मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगेंवर निशाणा साधला आहे. मनोज जरांगेंचे शिक्षण नाही, त्यांचा अभ्यास नाही तरीही ते बडबड करत आहेत, असे म्हणत भुजबळांनी टीका केली.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, मनोज जरांगे यांच्या मागण्या मारूतीच्या शेपटीसारख्या वाढत चालल्या आहेत. ते मुख्यमंत्र्यांना शिव्या देतात, उपमुख्यमंत्र्यांना शिव्या देतात. जरांगे सगळ्या लोकांना शिव्या देत आहेत. त्याचे शिक्षण, अभ्यास नाही तरीही ते बडबड करत आहे.त्यामुळे आता बघू काय होतंय?
जे लोक कायदा हातात घेतात त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, हे पोलिसांचे काम आहे. जरांगेंचे सहकारी त्यांच्यावर आरोप करत आहेत. त्यामुळे आता या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. म्हणजे जरांगेंच्या मागे नेमकं कोण आहे ते लक्षात येईल, असेही छगन भुजबळ म्हणाले.
पुढे ते म्हणाले, सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न हा आरोप हस्यास्पद आहे. यावर मी काय उत्तर देणार आहे. तसेच आता काही नाटकाचे स्क्रिप्ट लिहिण्याची सुरूवात झाली आहे. रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाच्या धर्तीवर मी जेव्हा होम डिपार्टमेंटला जाग येतेचं स्क्रिप्ट लिहितो आहे. तसेच दुसरे नाटक सीमेवरून परत जा. या दोन नाटकांची स्क्रिप्ट लिहितो आहे, असा खोचक टोलाही भुजबळांनी लगावला.