शासनाने जाहिर केले होते 6 लाख रुपयांचे बक्षिस
गडचिरोली, २६ फेब्रुवारी : नक्षलवादी फेब्रुवारी ते मे दरम्यान ‘टीसीओसी’ कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे, इत्यादी देशविघातक कृत्य करत असतात. याच टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने, अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका जहाल नक्षलवादी महिलेला रविवारी अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या जहाल महिला नक्षलीचे नाव राजेश्वरी ऊर्फ कमला पाडगा गोटा, वय ३० वर्षे, रा. बडा काकलेर तालुका भोपालपट्टनम, जि. बीजापूर (छ.ग.) असे आहे. या महिला नक्षलीचा प्रत्यक्ष चार पोलीस – नक्षल चकमकीत सहभाग होता. महाराष्ट्र शासनाने राजेश्वरी ऊर्फ कमला पाडगा गोटा हिच्या अटकेवर ६ लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.राजेश्वरी ऊर्फ कमला पाडगा गोटा २००६ साली चेतना नाट मंचामध्ये सदस्य या पदावर भरती होऊन माओवादी चळवळीत सक्रीय झाली. त्यानंतर २०१०-११ साली चेतना नाट मंचामध्ये उप-कमांडर या पदावर पदोन्नती झाली. तर २०१६ मध्ये तिची फरसेगड दलममध्ये बदली होऊन सन २०१९ पर्यंत सदस्य पदावर कार्यरत होती. त्यानंतर 2019 साली पोस्टे तोयनार जि. बीजापूर (छ.ग.) च्या जंगल परिसरात पोलीस पार्टीसोबत झालेल्या चकमकीच्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यात तिला अटक करण्यात आली होती. त्यानंतर 2020 मध्ये कारागृहातुन सुटका झाल्यानंतर आतापर्यंत टेलर टीम दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी अंतर्गत एसीएम (एरीया कमिटी मेंबर) पदावर कार्यरत होती.