आज मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीदरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मराठ्यांना संपवण्याचा कुणाचातरी डाव आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा हात आहे, असा गंभीर आरोप मनोज जरांगेंनी केला. त्यावर विरोधी पक्षातील नेते, आमदार, सत्ताधारी पक्षातील आमदारांनी आपापली मते माध्यमांसमोर मांडली आहेत. दरम्यान पोलिसांकडून बीड, अंबड तालुका अशा महत्वाच्या ठिकाणी जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. मात्र जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यातील शिरूर आणि अमळनेरमध्ये पोलिसांनी मनोज जरांगे पाटलांवर गुन्हा दाखल केला आहे. बिनापरवानगी रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी मराठा आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केले होते. मात्र आता पहिल्यांदाच या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज जरांगे पाटलांचे आमरण उपोषण स्थगित
गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी उपोषण करत होते. सरकारने १० टक्के आरक्षण दिल्यानंतर देखील सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी आमरण उपोषण सुरु केले होते. अखेर त्यांनी आज आपले आमरण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. काल जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांच्या जातीचा उल्लेख करत त्यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच आक्रमक भूमिका घेत ते सागर बंगल्यावर जाण्यासाठी निघाले होते. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी अंबड तालुक्यात संचारबंदीचे आदेश दिले आहेत. काही ठिकाणी बस सेवा आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच कालच्या जरांगे पाटलांच्या वक्तव्याचा अनेक सत्ताधारी नेत्यांनी निषेध केला. तसेच आंदोलनाची दिशा बदलत चालल्याचे त्यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीसांवर केलेला आरोपांवर भाजप नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. या सगळ्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान साखळी उपोषण सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढे काय करायचे ते मी ठरवेन. पुढील एक दोन दिवस मी उपचार घेईन. तसेच मी गावागावांमध्ये जाऊन मराठा बांधवांची भेट घेणार असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले.