आज अर्थसंकल्पीय अधिवेशधानाचा दुसरा दिवस आहे. आज अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडणार आहेत. मात्र अधिवेशनाची सुरुवात मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांवरून झाली. आशिष शेलार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत यावर आपले मत व्यक्त केले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी आपला मुद्दा विधानसभेत मांडला.
विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्देशांचे निश्चितपणे पालन होईल. माझी या विषयवार बोलण्याची इच्छा नव्हती मात्र, आता इथे विषय निघाला आहे तर काही एक दोन गोष्टी इथे मांडतो. मराठा समाजाच्या संदर्भात मी काय केले आहे ते सभागृहाला आणि समाजाला माहिती आहे. मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिले, ते हाय कोर्टात टिकवले. जोवर मी मुख्यमंत्री होतो तोवर ते सुप्रीम कोर्टात पण टिकवले. मराठा समाजाच्या बाबतीत मला कोणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. जरांगे पाटील माझ्यावर बोलले त्यानंतर मराठा समाज त्यांच्या मागे न उभा राहता माझ्या मागे उभा राहिला. खरे तर या सर्वाच्या मागे कोण आहे हे शोधणे आवश्यक आहे. जरंगे पाटील यांच्या बाबतीत मला काही घेणं देणं नाही. मात्र त्यांचा बोलावता धनी कोण आहे हे बाहेर यायला हवे.”
एसआयटी चौकशीचे विधानसभा अध्यक्षांचे आदेश
मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची SIT चौकशी करा, असे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्य सरकारला दिले आहेत.आजपासून (27 फेब्रुवारी) अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. अधिवेशनाला सुरूवात झाल्यानंतर दोन्ही सभागृहांमध्ये सत्ताधाऱ्यांनी जरांगेंच्या चौकशीबाबत मागणी केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी हे आदेश दिले आहेत. दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यावरून आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी नेते चांगलेच आक्रमक झाले. जरांगेंच्या विधानामागे कोण आहे? याची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत केली आहे. तर हीच मागणी प्रवीण दरेकर यानी विधानपरिषदेत केली आहे.