विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची SIT चौकशी करा, असे आदेश राज्य सरकारला दिले आहेत.आजपासून (27 फेब्रुवारी) अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. अधिवेशनाला सुरूवात झाल्यानंतर दोन्ही सभागृहांमध्ये सत्ताधाऱ्यांनी जरांगेंच्या चौकशीबाबत मागणी केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी हे आदेश दिले आहेत.
या एसआयटी चौकशीवर आता मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे आशिष शेलारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवणार आहेत. मी चुकीचा नसून मी कुठेच गुंतू शकत नाही. मला सगळ्यात जास्त फोन तुमचे आले आहेत. त्यामुळे फेस कॉलवर तुम्ही काय काय बोलले आहात हे मी पण उघड करतो, असा इशारा जरांगेंनी दिला आहे.
मी मराठ्यांचे काम करत असून ते सत्तेचा वापर करणार आहेत. देवेंद्र फडणवीस हे आशिष शेलारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवणार आहेत. जर एसआयटी चौकशीत माझं सगळं खरं निघालं तर एसआयटीला मात्र फडणवीसांना जेलमध्ये टाकावे लागेल. तसेच मी पळपुटा नाही, माझी एसआयटी चौकशी करा मी सगळं सांगतो, असेही मनोज जरांगे म्हणाले.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यावरून आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी नेते चांगलेच आक्रमक झाले. जरांगेंच्या विधानामागे कोण आहे? याची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत केली आहे. तर हीच मागणी प्रवीण दरेकर यानी विधानपरिषदेत केली आहे.
यावेळी आशिष शेलार म्हणाले की, महाराष्ट्र बेचिराख करण्याचे कोणी ठरवले? ही फक्त धमकी आहे का? यामध्ये संशय आहे का? की यात कोणी कट कारस्थाने केली आहेत? असे सवाल शेलार यांनी उपस्थित केले. तसेच जरांगेंच्या या भूमिकेमुळे मराठा समाजाची बदनामी होत आहे, त्यामुळे शांत बसू नका, असेही आशिष शेलार म्हणाले.
जरांगेंनी ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात भाषा वापरली ती योग्य नाही. यामध्ये तुला निपटून टाकू, अशी भाषा जरांगेंनी वापरली आहे. तसेच तुम्हाला शेवटची संधी देतो, असेही ते म्हणाले. हे चाललंय तरी काय? असा सवाल करत आशिष शेलार यांनी जरांगेंच्या मागून नेमके कोण बोलत आहे याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली.
तर दुसरीकडे विधानपरिषदेत प्रवीण दरेकर हे देखील जरांगेंविरोधात आक्रमक झाले होते. जरांगेंच्या विधानामागे नेमके कोण आहे? याची एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी दरेकरांनी केली. तसेच धमक्या देणाऱ्या जरांगेंना अटक करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.