संभलचे सपा खासदार शफीकुर्रहमान बर्क यांचे आज सकाळी निधन झाले आहे. 94 वर्षीय बर्क हे देशातील सर्वात वयस्कर खासदार होते. 29 जानेवारीपासून ते रुग्णालयात दाखल होते. त्यांना किडनीचा संसर्ग झाला होता. यापूर्वी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयातही त्यांच्यावर उपचार झाले होते.
शफीकुर्रहमान बर्क यांच्या निधनावर सपा प्रमुखांनी हळहळ व्यक्त केली आहे. सपाच्या पहिल्या यादीत त्यांना संभलमधून उमेदवारी देण्यात आली होती. त्यांचा नातू झियाउर रहमान बारक हा मुरादाबाद जिल्ह्यातील कुंडरकी विधानसभा मतदारसंघातून सपा आमदार आहे.
मूळचे संभलचे असलेले शफीकुर्रहमान बर्क हे देशातील सर्वात वयोवृद्ध खासदार होते. 1967 मध्ये चौधरी चरणसिंग यांच्या संपर्कात आल्यावर त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. भारतीय क्रांती दल (बीकेडी) कडून ते 1974 मध्ये संभलमधून पहिले आमदार झाले. यानंतर ते 1985 मध्ये लोकदल आणि 1989 मध्ये जनता दलाचे आमदार झाले. मुलायम सरकारमध्ये ते गृहरक्षक खात्याचे मंत्रीही होते.1995 मध्ये ते सपामध्ये दाखल झाले.
1996 मध्ये पक्षाने त्यांना मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. ते खासदार झाले. सलग तीनवेळा ते येथून खासदार होते. यानंतर 2009 मध्ये ते संभलमधून बसपचे खासदार झाले. तर त्यांचा 2014 मध्ये पराभव झाला होता. तर 2019 मध्ये ते सपामधून विजयी झाले होते. तसेच ते सपाचे संस्थापक सदस्य होते.