अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एजन्सीसमोर हजर राहण्यासाठी सातवे समन्स जारी केले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 26 फेब्रुवारीला ईडीसमोर हजर राहण्यास सांगितले होते. मात्र त्यावेळी केजरीवाल ईडीसमोर हजर राहिले नव्हते. आता ईडीने दिल्लीचे केजरीवाल यांना ८ वे समन्स बजावले आहे. ८ व्यांदा समन्स बजावून ४ मार्च रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश ईडीने केजरीवाल यांना दिले आहेत.
दरम्यान, याआधी ईडीने केजरीवाल यांना ७ समन्स पाठवले होते. ईडीने पाठवलेले समन्स बेकायदेशीर असल्याचे म्हणत केजरीवालांनी चौकशीस हजर राहणे टाळले होते. त्यानंतर ईडीने न्यायालयात धाव घेतली होती. १४ फेब्रुवारी रोजी ईडीने अरविंद केजरीवाल यांना सहाव्यांदा समन्स बजावले होते. तसेच १९ फेब्रुवारीला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. प्राप्त माहितीनुसार, ईडीने केजरीवाल यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १७४ अंतर्गत मुद्दामून समन्सकडे दुर्लक्ष केल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे. ईडीकडून समोर आलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने केजरीवाल यांनी समन्स वगळल्याची दखल घेतली व त्याद्वारे आप आदमी पक्षाच्या प्रमुखांची गुन्हा केला असून, त्यांच्यावर हा खटला चालवला जाऊ शकतो हे मान्य केले.
उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी ईडीच्या समन्सवर सातत्याने गैरहजर राहणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज, शनिवारी राऊस एव्हेन्यू कोर्टात हजेरी लावली. अर्थसंकल्पीय अधिवेशनातील चर्चेची सबब पुढे करत ते व्हिडीओ कॉन्फरन्सीगच्या माध्यमातून कोर्टात उपस्थित झाले होते. याप्रकरणी पुढील सुनावणी 16 मार्च रोजी होणार आहे.