बिहारचे माजी मुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या ताफ्यातील गाडीला भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. सध्या बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची लोकसभा निवडणुकीआधी बिहारमध्ये जनविश्वास यात्रा सुरु आहे. त्या दरम्यान प्रवास करत असताना तेजस्वी यादव यांच्या ताफ्यातील गाडीला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. ज्या गाडीचा अपघात झाला त्या गाडीच्या चालकाचा जागीच मृत्यू झाल्याचे कळते आहे. तर या अपघातामध्ये १० जण जखमी झाले आहेत. जनविश्वास यात्रेदरम्यान तेजस्वी यादव हे बिहारमधील ३८ जिल्ह्यांचा प्रवास करणार आहेत.
बिहार विधानसभेत तेजस्वी यादव हे नितीश कुमार यांच्याबरोबर सत्तेत होते. त्यानंतर बिहारमध्ये राजकीय उलथापालथ झाली आणि तेजस्वी यादव यांना विरोधी पक्षात बसावे लागले. तेजस्वी यादव यांच्या ताफ्यातील एस्कॉर्ट वाहन व नागरी वाहन यांच्या अपघात झाला. या अपघातामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये ६ पोलीस जखमी झाले आहेत. तसेच दुसऱ्या कारमधून प्रवास करणारे ४ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
देशात लोकसभा निवडणूक होणार आहेत. लवकरच निवडणुकांच्या तारखांची घोषणा होऊ शकते. त्यामुळे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाने निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. दरम्यान, विरोधी पक्षातील नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची जनविश्वास यात्रा सुरु आहे. त्यांच्या यात्रेचा दुसरा टप्पा २५ फेब्रुवारीपासून सुरु झाला आहे. या यात्रेचा समारोप १ मार्च रोजी होणार आहे.