राष्ट्र सेविका समितिने काशी येथे झालेल्या अखिल भारतीय कार्यकारिणी आणि प्रतिनिधी मंडळ बैठकीत संदेशखाली येथील घटनेचा जाहीर निषेध करत त्या विषयी प्रस्ताव मंजूर केला आहे.
▪️समितीच्या प्रमुख कार्यवाहिका सीता गायत्री यांनी या विषयी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पश्चिम बंगाल येथील संदेशखाली येथे महिलांवर होणारे अत्याचार / त्रास हे अत्यंत खेदजनक आणि गंभीरतेचे विषय आहेत. दुर्दैवाने राज्याच्या मुख्यमंत्री पदी एक स्त्री असूनही तेथील महिलांवर होणाऱ्या अन्यायांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही ही खेदाची बाब आहे.जननी, जन्मभूमी आणि संपूर्ण जगामध्ये मातृत्वाची विशाल परंपरा प्रस्थापित करणाऱ्या आपल्या बंगालमध्ये आज निरपराध, निर्दोष महिलांचे शोषण आणि वेदनादायी अवस्था निंदनीय आहे.
▪️गेल्या काही वर्षांपासून येथील 24 परगणा जिल्ह्यातील या सीमावर्ती भागातील सामाजिक जडणघडण विस्कळीत होताना दिसत आहे. अराजकीय वातावरण, सामाजिक चळवळी, बेकायदेशीर घुसखोरी आणि लोकसंख्येचा असमतोल राखण्याचे प्रयत्न हेही राष्ट्राच्या सुरक्षेसाठी अत्यंत धोकादायक आहे. सर्वोच्च न्यायालयाचे विभागीय खंडपीठ, राष्ट्रीय महिला आयोग, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या सर्व संस्थांनी कडक शब्दात फटकारले असतानाही राज्य सरकारने कोणतीही कारवाई केली नाही आणि आरोपींना अटक करण्याचे कोणतेही प्रयत्न केले गेले नाहीत. प्रयत्नही न करता या संपूर्ण प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या हीन मानसिकतेचे दर्शन घडवत आहे. महिलांचे संरक्षण आणि त्यांना सामाजिक न्याय देण्यात बंगाल राज्य प्रशासन अपयशी ठरले आहे. पाशवी बलात्कार आणि महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेल्या शाहजहान शेख सारख्या गुन्हेगारांना राज्य सरकारकडून आश्रय मिळत असल्याचे दिसते हे निंदनीय आहे.
▪️राष्ट्र सेविका समितीचे हे ‘अखिल भारतीय कार्यकारी व प्रतिनिधी मंडळ’ ज्यामुळे सुसंस्कृत समाजाचे मस्तक लाजेने खाली जाते अशा या दुर्दैवी परिस्थितीसाठी पश्चिम बंगाल सरकारचा जोरदार निषेध करते, तसेच पीडित महिलांप्रती तीव्र शोक व्यक्त करताना केंद्र सरकारचे आभार व्यक्त करते.
याबरोबरच सरकार, पोलीस आणि तपास यंत्रणांना विनंती करते की, सर्व गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी. तसेच पीडित महिलांवर शारीरिक आणि मानसिक उपचार आणि त्यांच्या पुनर्वसनाची व्यवस्था लवकरात लवकर करण्यात यावी.
▪️अमानुष अत्याचाराला बळी पडलेल्या पीडित बहिणींच्या दु:खाबद्दल शोक व्यक्त करत राष्ट्र सेविका समिती आशवस्त करते की, ‘या कठीण परिस्थितीत आम्ही तुमच्यासोबत आहोत. अन्यायाविरुद्ध निर्भयपणे आवाज उठवण्याच्या तुमच्या धाडसाचा आम्हाला अभिमान आहे.’ पश्चिम बंगाल मधीलच नव्हे तर पूर्ण देशभरातील सर्व सेविका या भगिनींना शक्य ती मदत करण्यास तयार आहेत.
सौजन्य -विश्व संवाद केंद्र,पुणे