हिमाचल प्रदेशमधील काँग्रेस सरकारविरोधात भारतीय जनता पक्षाने विश्वासदर्शक ठरावाची मागणी केली आहे. भाजपने राज्यपालांना भेटून ही मागणी केली आहे. तसेच भाजपने विश्वासदर्शक ठरावाची मागणी का केली याबाबतचे कारणही आता समोर आले आहे.
आज भाजपचे वरिष्ठ नेते जयराम ठाकूर यांनी पक्षाच्या आमदारांसह राज्यपाल शिवप्रताप शुक्ला यांची राजभवनावर जाऊन भेट घेतली. तर मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने राज्यपालांना भेटून हिमाचल प्रदेशच्या विधानसभेत विश्वासदर्शक ठराव घेण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिख्खू यांनी बहुमत गमावल्याचे सांगत भाजपने ही मागणी केल्याचे म्हटले जात आहे.
काल (27 फेब्रुवारी) झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसकडे संख्याबळ असताना देखील त्यांचा उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांचा पराभव झाला. यामध्ये काँग्रेसच्या 6 आणि अपक्षांच्या 3 आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचे म्हटले जात आहे. कारण संख्याबळ असतानाही क्रॉस वोटिंगमुळे भाजप आणि काँग्रेस उमेदवाराला समान 34 मते मिळाली होती. समान मते मिळाल्यानंतर लकी ड्रॉ काढण्यात आला त्यामध्ये अभिषेक मनु सिंघवी यांचा पराभव झाला.
विधानसभेत काँग्रेसचे 43 इतके संख्याबळ आहे तर भाजपचे 25 इतके संख्याबळ आहे. मात्र, काँग्रेसच्या आमदारांनी भाजपच्या बाजूने मतदान केल्यामुळे काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे. त्यामुळे राज्यात काँग्रेसच्या आमदारांमध्ये नाराजी असल्याचे सांगत भाजपने सरकारवर आमदारांचा विश्वास नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांनी विश्वासदर्शक ठरावाची मागणी केल्याचे सांगितले जात आहे.