काल देशभरात ५६ जागांसाठी राज्यसभेची निवडणूक पार पडली. यामध्ये अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणूक पार पडली तर, काही ठिकाणी राज्यसभेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. महाराष्ट्रामध्ये ६ जागांसाठी राज्यसभेची निवडणूक झाली. महाराष्ट्रातील राज्यसभेची निवडणूक बिनविरोधपणे झाली आहे. या निवडणुकीत भाजपाचे अशोक चव्हाण, डॉ. अजित गोपछडे आणि मेधा कुलकर्णी, शिवसेनेचे मिलिंद देवरा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल आणि काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे हे बिनविरोध राज्यसभेवर निवडून गेले आहेत.
देशातील ५६ जागांपैकी ४१ जागांवर बिनविरोध निवडणूक पार पडली. उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशमध्ये राज्यसभेची निवडणूक चुरशीची झाली आहे. आता हिमाचल प्रदेशमध्ये क्रॉस व्होटिंग झाले आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेशमध्ये सरकारपुढील अडचणी वाढल्या आहेत. कारण काँग्रेसचे आमदार विक्रमादित्य सिंग यांनी राजीनामा दिला आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत अभिषेक मनू सिंघवी यांच्या विरोधात क्रॉस व्होटिंग झाल्यामुळे भाजपाचे हर्ष महाजनी हे विजयी झाले आहेत. हिमाचलमधील काँग्रेस आमदार यांची मुख्यमंत्र्यांवर नाराजी असल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचे समजते आहे. उत्तर प्रदेशमध्ये देखील भाजपाने १० पैकी राज्यसभेच्या ८ जागा जिंकल्या आहेत. समाजवादी पार्टीच्या काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग करत भाजपाला मतदान केल्यामुळे भाजपाचा उमेदवार विजयी झाला आणि सपाचा उमेदवार पराभूत झाला.