नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीमध्ये हिमाचल प्रदेशात सत्तेवर असलेल्या काँग्रेस पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे तर भाजपने बाजी मारली आहे. आता या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशात राजकीय घडामोडींना वेग आलेला दिसून येत आहे. एकीकडे काँग्रेसच्या सहा आमदारांनी पक्षाविरोधात बंड केले आहे, तर दुसरीकडे काँग्रेस नेते वीरभद्र सिंग यांचा मुलगा विक्रमादित्य सिंग यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची बातमी समोर आली आहे.
काँग्रेसचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी आमदारांकडे दुर्लक्ष केल्याचा आणि आपले वडील आणि काँग्रेसचे दिवंगत नेते वीरभद्र सिंग यांच्या अपमान केल्याचा आरोप करत विक्रमादित्य सिंग राज्यमंत्री पदावरून पायउतार झाले आहेत.
पत्रकार परिषद घेत घेत विक्रमादित्य सिंग यांनी आपल्या भूमिकेचा खुलासा केला आहे.आपले वडील वीरभद्र सिंग, ज्यांच्यामुळे हिमाचलमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन झाले त्यांचा पुतळा बसवण्यासाठी शिमल्यातील मॉल रोडवर 2 यार्ड जमीन देण्यात आली नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे. असे विक्रमादित्य सिंग यांनी म्हंटले आहे.
विक्रमादित्य यांनी राज्यसभा निवडणुकीदरम्यान क्रॉस व्होटिंगला दुर्दैवी म्हटले आहे. ते म्हणाले की, “आमदारांकडे दुर्लक्ष झाले आहे. आमदारांना त्रास दिला गेला. हे मुद्दे हायकमांडसमोर वारंवार मांडण्यात आले. सरकार स्थापन करण्यात आम्ही खूप महत्त्वाचे योगदान दिले आहे.मात्र हे आम्हाला वारंवार सांगावे लागते आहे ” .
गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेश मधल्या काँग्रेस पक्षामध्ये कलह सुरु असल्याचा बातम्या समोर येत होत्या. गेल्याचा महिन्यात मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या अध्यक्षतेखाली हिमाचल मंत्रिमंडळाची बैठक झाली असता विक्रमादित्य सिंह यांच्यासह इतर दोन मंत्र्यांकडून त्यांचे विभाग कडून घेण्यात आले होते. यावेळी मंत्रिमंडळातून तीनही मंत्री एकाचवेळी गायब झाल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या होत्या.