२०१९ मध्ये भाजपा-शिवसेना युती तुटली आणि उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी आघाडी करत सत्ता स्थापन केली. तेव्हापासून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी युती मोडली असा आरोप भाजपकडून करण्यात येतो. ठाकरेंनी साथ सोडल्यामुळे भाजपाला विरोधात बसावे लागले आणि फडणवीसांना मुख्यमंत्री पदाऐवजी विरोधी पक्षनेत्यांची भूमिका पार पाडावी लागली. तसेच ठाकरे गटाकडून भाजपाने विश्वासघात केल्याचा आरोप करण्यात येतो. दरम्यान टीव्ही ९ नेटवर्कच्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री यांनी उद्धव ठाकरे आणि इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल चढवला. या कार्यक्रमात त्यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमध्ये त्यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी इंडिया आघाडी, उद्धव ठाकरे , महाविकास आघाडी आणि त्यांच्यातील घराणेशाहीवर जोरदार टीका केली. यावेळी अमित शाह म्हणाले, ”इंडी आघाडी हे बाकी नसून, सत्तेसाठी एकत्रित आलेल्या घराणेशाही पक्षांची ती आघाडी आहे. त्यांच्यातील नेते आपला मुलगा, मुलगी, पुतण्या आणि अन्य नातेवाईकांना पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री बनवण्यासाठी एकत्रित आले आहेत. कोणालाही भारत देशाची काळजी नाहीये. आपला मुलगा मुख्यमंत्री व्हावा हे उद्धव ठाकरेंचे लक्ष्य आहे.”
देशात लवकरच लोकसभेची निवडणूक होणार आहे. यासाठी भाजपाने आणि ‘इंडी’ आघाडीने जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजपाने एनडीएला ४०० पेक्षा जास्त तर भाजपाला ३७० पेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला आहे. तर भाजपा २०२४ निवडणुकीत पराभूत होईल असे विरोधकांचा दावा आहे.