कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज बंगळुरूमधील विधानसभेच्या बाहेर निदर्शने केली. तसेच मंगळवारी निवडणूक जिंकलेल्या राज्यसभा खासदार सय्यद नसीर हुसेन यांच्या समर्थकांनी पाकिस्तान समर्थक घोषणा दिल्याचा आरोप केला. तथापि, काँग्रेस नेता आणि कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याच्या भाजपाच्या आरोपांचे खंडन केले. “नसीर हुसेन आणि सय्यद साहब जिंदाबाद” अशी घोषणा त्यांचे समर्थक देत होते असे खर्गे म्हणाले.
“ऑडिओमध्ये हे अगदी स्पष्ट आहे की त्यांनी नसीर हुसेन आणि सय्यद साहब झिंदाबाद म्हटले आहे. भाजप सत्तेत परत येण्यासाठी हे करत आहे. पक्षाने ऑडिओची फॉरेन्सिक तपासणी केली आहे आणि जे मी म्हटले तेच त्यात आढळले आहे. सरकारचा एफएसएल अहवाल सकाळी ११ वाजेपर्यंत अपेक्षित आहे”, असे प्रियांक खरगे यांनी सांगितले.
कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष यूटी खादर म्हणाले की, फॉरेन्सिक विश्लेषणाद्वारे दावे सिद्ध झाल्यास या मागे असणाऱ्या व्यक्तीला शिक्षा होईल. याची संपूर्ण चौकशी केली जाईल असे विधानसभा अध्यक्ष म्हणाले. “राज्यसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या आवाराबाहेर ही घटना घडली होती. जर ती खरी असेल तर मी त्याचा निषेध करतो आणि कारवाई झाली पाहिजे. घोषणाबाजी करणारा हा व्यक्ती कोण होता, तो आत कसा आला, याच्या सविस्तर चौकशीची गरज आहे? मी गृहमंत्री,मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करेन. पोलिसांनी सविस्तर तपास केला पाहिजे. मी सर्व पक्षांना विनंती करतो की त्यांनी या मुद्द्याचे राजकारण करू नये. त्यांनी चौकशीत सहकार्य करावे.” यूटी खादर म्हणाले. या सर्व प्रकरणामुळे कर्नाटक राज्यात राजकीय गोंधळ सुरु झालाय. ज्यामध्ये बंगळुरूमध्ये विधानसभेच्या बाहेर भाजपाने विरोध प्रदर्शन केले. काँग्रेसने भाजपाचे आरोप फेटाळले आहेत.