कर्नाटकमध्ये राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांच्या विजयानंतर पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी झाल्याचा भाजपचा आरोप आहे. या घटनेच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी बेंगळुरूतील विधानसभेबाहेरही निदर्शने केली. तसेच पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
कर्नाटकातील राज्यसभेच्या 4 जागांसाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला 3 जागा मिळाल्या आहेत, तर एक जागा भाजपच्या खात्यात गेली आहे. कर्नाटकात काँग्रेसचे 3 उमेदवार अजय माकन, डॉ. सय्यद नसीर हुसेन आणि जीसी चंद्रशेखर हे अनुक्रमे 47, 46 आणि 46 मतांनी विजयी झाले. मात्र, आता भाजपने काँग्रेसच्या विजयोत्सवाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काही वेळातच सय्यद नसीर हुसैन यांचे समर्थक विधानसभेत ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देताना ऐकू येत आहेत.
काँग्रेस नेत्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत भाजपने मंगळवारी रात्री उशिरा हुसैन यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. भाजपचे आमदार एन. रविकुमार आणि पक्षाचे आमदार आणि मुख्य सचेतक दोड्डंगौडा पाटील यांनी हुसेन आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध विधान सौधा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. अशा परिस्थितीत राज्यसभा खासदार नसीर हुसैन यांनी एक व्हिडिओ जारी करून स्पष्टीकरण दिले की, रॅलीत अशा घोषणा देण्यात आलेल्या नाहीत, तसेच त्यांनी ‘नसीर हुसेन झिंदाबाद’, ‘काँग्रेस पार्टी झिंदाबाद,’ ‘नसीर खान झिंदाबाद’ आणि ‘नसीर साब जिंदाबाद’ अशा घोषणाच ऐकल्या.
याप्रकरणी आता मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांची प्रतिक्रिया देखील पुढे आली आहे यासंदर्भात सिद्धरामैय्या म्हणाले आहेत की,याबाबत चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल.