भारतातील मोठ्या उद्योगपतींपैकी एक असणारे गौतम अदानी यांनी संरक्षण क्षेत्राबाबत एक मोठी घोषणा केली आहे. गौतम अदानी यांच्या अडाणी समूहाने संरक्षण क्षेत्राबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. गौतम अदानी यांचा अदानी समूह संरक्षण क्षेत्राशी संबंधित दोन शस्त्रास्त्रे कारखाने बांधणार आहे. यामध्ये अदानी समूह ३ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये हे कारखाने उभारण्यात येणार आहे.
अदानी समूहातर्फे उभारण्यात येणाऱ्या या दोन शस्त्रास्त्रे कारखान्यात दारुगोळा तयार केला जाणार आहे. यामुळे तब्बल ४ हजार रोजगार निर्माण होणार आहेत. अदानी समूह या कारखान्यांमधून १५ कोटी इतका दारुगोळा तयार करणार आहे. जो भारतीय लष्कराच्या एकूण गरजेपैकी चौथा भाग आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक शस्त्रे आणि दारुगोळा निर्मितीसाठी चालना मिळणार आहे. तसेच रोजगाराच्या संधी देखील या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. हे कारखाने सुमारे ५०० एकरावर उभारण्यात येणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली आहेत. संरक्षण क्षेत्रातील आयात कमी करण्यासाठी भारत सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे. अदानी समूह, टाटा समूह आणि महिंद्रा समूह आणि अन्य काही समूह भारतीय सुरक्षा दलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. २०२५ पर्यंत मोठ्या कॅलिबर तोफा आणि टॅंक शेल्सच्या २ लाख फेऱ्या तयार केल्या जाणार आहेत. या कारखान्यांमध्ये कमी आणि लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे येथे तयार करण्यात येणार आहे.