नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीमध्ये हिमाचल प्रदेशात सत्तेवर असलेल्या काँग्रेस पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर, भाजपने बाजी मारली आहे. आता या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशात राजकीय घडामोडींना वेग आलेला दिसून येत आहे. एकीकडे काँग्रेसच्या सहा आमदारांनी पक्षाविरोधात बंड केले आहे, तर दुसरीकडे काँग्रेस नेते वीरभद्र सिंग यांचा मुलगा विक्रमादित्य सिंग यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची बातमी समोर आली आहे. त्यातच आता हिमाचल प्रदेशच्या विधानसभा अध्यक्षांनी १५ भाजपा आमदारांचे निलंबन केले आहे. दरम्यान, यातच मुख्यमंत्र्यानी देखील राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले होते.
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र राजीनामा दिल्याचे वृत्त त्यांनी फेटाळून लावले आहे. मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाहीये. तसेच विधानसभेत आम्ही बहुमत सिद्ध करू असे देखील सुखविंदर सिंग सुखू म्हणले आहेत. पक्षातून कोणीही माझा राजीनामा मागितला नसल्याचे मुख्यमंत्र्यानी स्पष्ट केले आहे. “ना कोणी माझा राजीनामा मागितला आहे ना मी कोणाकडे राजीनामा दिला आहे. आम्ही बहुमत सिद्ध करू. आम्ही जिंकू, हिमाचलचे लोक जिंकतील”, असे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू म्हणाले. तसेच आम्ही घाबरणार नाही. हिमाचलमध्ये काँग्रेसच सत्तेत राहणार असे मुख्यमंत्री म्हणाले.
भाजपाचे १५ आमदार निलंबित
हिमाचल प्रदेशच्या विधानसभा अध्यक्षांनी १५ भाजपा आमदारांचे निलंबन केले आहे. हिमाचल प्रदेशमध्ये विधानभवनात भाजपाचे आमदार सतत गोंधळ घालत होते. त्यामुळे कामकाजामध्ये अडथळा निर्माण होत होते. यासाठी १५ भाजपा आमदारांना निलंबित केल्याचे विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया यांनी सांगितले. कामकाज थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया यांनी सांगितले.