भारताचे संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांनी मंगळवारी (27 फेब्रुवारी) बर्लिन येथे, जर्मनीच्या संरक्षण मंत्रालयाचे राज्य सचिव बेनेडिक्ट झिमर यांच्या समवेत भारत-जर्मनी उच्च संरक्षण समिती (HDC) बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवले. भारत आणि जर्मनी यांच्यातील धोरणात्मक भागीदारीचा प्रमुख आधारस्तंभ म्हणून संरक्षण सहकार्य विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करत, दोन्ही देशांनी द्विपक्षीय सुरक्षा आणि संरक्षण या विषयांवर चर्चा केली.
दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक सुरक्षेच्या परिस्थितीवर विचार विनिमय केला, तसेच इंडो-पॅसिफिक क्षेत्रात जर्मनीसोबतच्या संभाव्य संयुक्त सरावांवर चर्चा केली, याशिवाय, संभाव्य संरक्षण औद्योगिक प्रकल्प आणि प्रस्तावांवर देखील चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी घनिष्ठ संरक्षण भागीदारी आणि दोन्ही बाजूंच्या संरक्षण उद्योगांना एकमेकांशी जोडण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. या चर्चेत संरक्षण क्षेत्रातील उच्च तंत्रज्ञानात सहकार्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.
जर्मनीचे संरक्षण मंत्री बोरिस पिस्टोरियस यांच्या 2023 मधील भारत भेटीनंतर उच्च संरक्षण समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
गिरीधर अरमाने यांनी या बैठकीनंतर बर्लिनमधील जर्मन इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अँड सिक्युरिटी अफेयर्स (स्टिफ्टंग विसेनशाफ्ट अंड पॉलिटिक – एसडब्ल्यूपी) या प्रख्यात संस्थेतील विचारवंतांशी संवाद साधला.