पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज यवतमाळ दौऱ्यावर आले आहेत. डोरली येथील एका कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले होते. यावेळी त्यांनी सभेला देखील संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजच्या कार्यक्रमात विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण व लाभार्थ्यांना वितरण केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरण देखील केले. या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टीचे सहसंस्थापक (आधीचा भारतीय जनसंघ) पंडित दीनदयाळ उपाध्याय हे एक हिंदुत्ववादी विचारवंत आणि भारतीय राजकारणी होते. पंडित दीनदयाळ उपाध्याय हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होते. तसेच ते भारतीय जनसंघाचे अध्यक्ष होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. तसेच अनेक लाभार्थ्यांना त्यांना मिळालेल्या लाभाचे वितरण देखील केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेला संबोधित केले. डोरला येथील सभेत बोलताना मोदींनी जय भवानी जय शिवाजी, जय सेवालाल अशी घोषणा देत भाषणाला सुरुवात केली.तसेच त्यांनी यावेळी विरोधकांवर जोरदार टीका केली. मोदी म्हणाले, ” मी १० वर्षांपूर्वी येथे आलो तेव्हा एनडीए ३०० पार गेली होती. २०१९ मध्ये आलो तेव्हा एनडीए ३५० पेक्षा जास्त जागा जिंकून अली होती. आता २०२४ मध्ये आलोय तर यंदा ४०० पेक्षा जास्त जागा येतील असा मला विश्वास आहे.”