चित्रपट अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कारण यूपी रामपूरमधील विशेष न्यायालयाने त्यांना ‘फरार’ घोषित केले आहे आणि त्यांच्या अटकेचे आदेशही दिले आहेत. कारण जया प्रदा त्यांच्याविरुद्धच्या दोन खटल्यांच्या सुनावणीत हजर झालेल्या नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, जयाप्रदा यांना हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. त्याचबरोबर सात वेळा अजामीनपात्र वॉरंटही बजावण्यात आले आहे, मात्र प्रत्येक वेळी त्या कोर्टात हजर झाल्या नाहीत.
2019 मध्ये जया प्रदा यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, या प्रकरणाची सुनावणी मॅजिस्ट्रेट ट्रायल कोर्टात सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणात अद्याप जयाप्रदा यांचा जबाब नोंदवण्यात आलेला नाही. आजही रामपूरचे खासदार-आमदार न्यायालय त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी बसले होते, मात्र त्यांच्या गैरहजेरीमुळे न्यायालयाला कठोर भूमिका स्वीकारावी लागली. जयाप्रदा यांच्या विरोधात कलम 82 अंतर्गत कारवाई सुरू करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायालयात सुनावणीदरम्यान रामपूर पोलिसांनी आपला जबाब नोंदवताना माजी खासदार जया प्रदा स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले. त्यांचे सर्व मोबाईल नंबरही सतत बंद आहेत. पोलिस अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, माजी खासदाराचे हे वर्तन पाहून न्यायाधीश शोभित बन्सल यांनी त्यांच्याविरोधात कठोर भूमिका घेतली असून जयाप्रदा यांना फरार घोषित केले आहे.
न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढून जयाप्रदा यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. जयाप्रदा यांना अटक करून त्यांना कोर्टात हजर करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस अधीक्षकांना दिलेल्या आदेशात सीओ स्तरावरील अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार करून जयाप्रदा यांना न्यायालयात हजर करा, असे आदेश देण्यात आले आहेत.