पश्चिम बंगालमधील संदेशाखाली येथील प्रकरणामध्ये अखेर पश्चिम बंगाल पोलिसांनी महत्वाची कारवाई केली आहे. संदेशाखाली येथील प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या शाहजहान शेख यांना पोलिसांनी अटक केली आहे. शाहजहान शेख हे तृणमूल काँग्रेसचे नेते देखील आहेत. कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशाने बंगाल पोलिसांनी ही अटक केली आहे. बंगाल पोलिसांनी शाहजहान शेखला सरबेरिया येथून रात्रीच अटक केली आहे. आज सकाळी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
दरम्यान, संदेशाखाली प्रकरणात कोलकत्ता उच्च न्यायालयाने ममता बॅनर्जी सरकारवर कठोर ताशेरे ओढले आहेत. तृणमूल काँग्रेसचे नेते शाहजहान शेख याना अटक होणे आवश्यक असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले होते. शाहजहान शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर संदेशखाली येथील महिलांवर अत्याचाराचे आरोप करण्यात आले आहेत. तसेच जबरदस्तीने जमीन हडपत असल्याचा आरोप देखील त्यांच्यावर आहे. संदेशाखाली परप्रकणात चौकशीसाठी गेलेल्या ठिकाण ईडीच्या पथकावर हल्ला झाल्यापासून शाहजहान शेख हे फरार आहेत. संदेशाखाली प्रकरणात शाहजहान शेख यांनी अटक टाळण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र त्यांची याचिका कोलकत्ता उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. उच्च न्यायालयात संदेशाखाली प्रकरणी सुनावणी सुरु आहे. शाहजहान शेख यांच्या अटकेवर कोर्टाने कधीही आपले मत व्यक्त केले नाही असे सुनावणी दरम्यान न्यायमूर्तीनी सांगितले. त्यांना अटक झाली पाहिजे असे न्यायालयाने सुनावणी दरम्यान म्हटले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार, आता बंगाल पोलिसांनी शाहजहान शेख यांना अटक केली आहे.
दरम्यान, पश्चिम बंगाल सरकारने संदेशखालीसह सात ग्रामपंचायतीमध्ये अर्धा किलोमीटरच्या परिसरात कलम १४४ लागू केले आहे. संदेशखाली येथे महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटनेमुळे त्या भागात भाजपाने आंदोलन सुरु केले आहे. त्यादृष्टीने परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी १९ फेब्रुवारीपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. बंगालमधील संदेशखाली येथील घटनांवरून राजकीय वादळ उठल्याने मंगळवारी राज्याच्या आणखी एका भागात हिंसाचार उसळला.