देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी त्याची बालपणीची मैत्रिण राधिका मर्चंट हिच्याशी लग्न करणार आहे. त्यामुळे सध्या दोन्ही कुटुंबात लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. गुजरातमधील जामनगर येथे 1 ते 3 मार्च या कालावधीत प्री-वेडिंगचे काही कार्यक्रम होणार आहेत. प्री-वेडिंगचे हे कार्यक्रम अतिशय भव्यदिव्य होणार असून, तिथे खानपानाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
या दिमाखदार लग्नाचा प्री-वेडिंग सोहळा बुधवारपासून सुरू झाला आहे. तर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याची सुरूवात अन्न सेवेने झाली आहे. जामनगरमधील रिलायन्स टाउनशिपजवळील जोगवाड गावात मुकेश अंबानी, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटसह अंबानी कुटुंबातील इतर सदस्यांनी गावकऱ्यांना पारंपारिक गुजराती जेवण वाढत या सोहळ्याला सुरूवात केली. या अन्न सेवेत राधिकाची आजी आणि आई-वडील वीरेन आणि शैला मर्चंट यांनीही भाग घेतला होता. पुढील काही दिवस सुमारे 51 हजार स्थानिक रहिवाशांना जेवण दिले जाणार आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी स्थानिक समुदायाचा आशीर्वाद घेण्यासाठी अंबानी कुटुंबाने अन्न सेवा आयोजित केली आहे. भोजनानंतर उपस्थितांनी पारंपरिक लोकसंगीताचा आस्वाद घेतला. सुप्रसिद्ध गुजराती गायक कीर्तिदान गढवी यांनी आपल्या गायनाने या कार्यक्रमात उपस्थितांमा मंत्रमुग्ध केले.
दरम्यान, अंबानी कुटुंबात जेवण देण्याची परंपरा जुनी आहे. अंबानी कुटुंब शुभ कौटुंबिक प्रसंगी भोजन देत असतात. तसेच कोरोना महामारीच्या काळात देश संकटात असतानाही अनंत अंबानी यांच्या आई नीता अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स फाऊंडेशनने जगातील सर्वात मोठा अन्न वितरण कार्यक्रम राबवला होता. तर आता कौटुंबिक परंपरेला पुढे नेत अनंत अंबानी यांनी त्यांच्या लग्नाआधीची कार्ये अन्न सेवेसोबत सुरू केली आहेत.