नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीमध्ये हिमाचल प्रदेशात सत्तेवर असलेल्या काँग्रेस पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर भाजपने बाजी मारली आहे. आता या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशात राजकीय घडामोडींना वेग आलेला दिसून येत आहे. एकीकडे काँग्रेसच्या सहा आमदारांनी पक्षाविरोधात बंड केले आहे, तर दुसरीकडे काँग्रेस नेते वीरभद्र सिंग यांचा मुलगा विक्रमादित्य सिंग यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची बातमी समोर आली आहे. त्यातच आता हिमाचल प्रदेशच्या विधानसभा अध्यक्षांनी १५ भाजपा आमदारांचे निलंबन केले आहे. आता विधानसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या ६ आमदारांना अपात्र केले आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी २७ तारखेला हिमाचल प्रदेशमध्ये मतदान झाले. यांमध्ये काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले. काँग्रेसकडे आपला उमेदवार निवडणून आण्यासाठी बहुमत होते. मात्र क्रॉस व्होटिंग झाल्यामुळे काँग्रेसच्या अभिषेक मनू सिंघवी यांचा पराभव झाला. मात्र कॉग्रेसच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्यामुळे पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया यांनी काँग्रेसच्या ६ आमदारांना अपात्र केले आहे. काँग्रेस आमदारांनी पक्षाचा व्हीप न पाळल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेश मधल्या काँग्रेस पक्षामध्ये कलह सुरु असल्याचा बातम्या समोर येत होत्या. गेल्याचा महिन्यात मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या अध्यक्षतेखाली हिमाचल मंत्रिमंडळाची बैठक झाली असता विक्रमादित्य सिंह यांच्यासह इतर दोन मंत्र्यांकडून त्यांचे विभाग कडून घेण्यात आले होते. यावेळी मंत्रिमंडळातून तीनही मंत्री एकाचवेळी गायब झाल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या होत्या.