पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 मार्चला बिहारमध्ये येणार आहेत. ते बेगुसराय येथून 1.64 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या देशव्यापी प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. तर यातील 29 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प बिहारसाठी आहेत.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचा हा पहिलाच बिहार दौरा आहे. बेगुसराय येथून सुरू होणारे हे प्रकल्प तेल, वायू, खत आणि रेल्वे यासह अनेक क्षेत्रांशी संबंधित आहेत.
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात सूत्रांनी सांगितले की, पायाभरणी समारंभात या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात येणार असून त्यापैकी 39 प्रकल्प तेल आणि वायू क्षेत्राशी संबंधित आहेत. तर 10 प्रकल्प रेल्वे क्षेत्राशी संबंधित आहेत. या कालावधीत 6 नवीन रेल्वे गाड्यांनाही हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. तसेच सुरू होणारे हे रेल्वे प्रकल्प बहुतांश उत्तर बिहारवर केंद्रित असणार आहेत.
पंतप्रधान मोदी नव्याने स्थापन झालेल्या बरौनी खत प्रकल्पाचे उद्घाटनही करणार आहेत, ज्यामुळे युरियाचे देशांतर्गत उत्पादन तर वाढेलच पण रोजगाराच्या संधीही निर्माण होतील. या प्लांटची क्षमता 12.7 लाख एमटीपीए युरिया उत्पादनाची असेल.
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी 28 फेब्रुवारी रोजी तमिळनाडूच्या तूत्तुक्कुडी येथे सुमारे 17,300 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली आहे. यामध्ये देशातील पहिले हायड्रोजन हब बंदर आणि अंतर्देशीय जलमार्गाचा समावेश आहे. ग्रीन बोट इनिशिएटिव्ह अंतर्गत हे जहाज बांधण्यात आले आहे. याशिवाय PM मोदींनी VO चिदंबरनार बंदर येथे आऊटर हार्बर कंटेनर टर्मिनलचीही पायाभरणी केली.