पंजाब हरियाणातील शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. दिल्लीच्या अनेक सीमांवर आंदोलक शेतकरी हे मोठ्या संख्येने एकत्रित आले आहेत. दरम्यान काही ठिकाणी शेतकरी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक देखील झालेली पाहायला मिळाली. शंभू सीमेवर तर सुरक्षा दलांनी अशुधुराच्या नळकांड्या देखील फोडल्याचे समोर आले आहे. केंद्र सरकार सातत्याने शेतकऱ्यांशी चर्चा करत आहे. तसेच महाराष्ट्र नक्षल विरोधी पथकाने या आंदोलनात माओवाद्यांचा सहभाग असल्याचे काही रिपोर्ट्स सरकारकडे दिले होते. दरम्यान, आता हरियाणा सरकारने आंदोलक शेतकऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
पंजाब हरियाणा सीमेवर आंदोलन करून सार्वजनिक ठिकाणी तोडफोड केल्याबद्दल तसेच हिंसाचारात सहभागी झालेल्या आंदोलकांचे पासपोर्ट आणि व्हिजा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. हरियाणा पोलिसांनी याबाबतची माहिती दिली. शेतकरी आंदोलनात पंजाबमधून असे काही लोक आले होते ते हिंसेत सहभागी झाले होते असे पोलिसांचे म्हणणे आहे.
संयुक्त किसान मोर्चा, किसान मजदूर मोर्चा एमएसपी, सरसकट कर्जमाफी आणि गुन्हे मागे घेण्यासंदर्भात केंद्र सरकार विरोधात आंदोलन करत आहेत. केंद्रीय कृषिमंत्री अर्जुन मुंडा हे सातत्याने शेतकऱ्यांशी चर्चा करत आहेत. आतापर्यंत पाच ते सहा चर्चेच्या फेऱ्या केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये झाल्या आहेत. मात्र शेतकऱ्यांनी केंद्र सरकारने दिलेला प्रस्ताव फेटाळून लावला आहे आणि आपल्या मागण्यांवर शेतकरी ठाम आहेत.
शंभू आणि खनौरी सीमेवर परिस्थिती गंभीर होत आहे. पंजाबचे 14 हजार शेतकरी 1200 ट्रॅक्टर-ट्रॉलींवर स्वार होऊन शंभू सीमेवरून राजधानी दिल्लीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचवेळी खनौरी सीमेवर देखील सुमारे 800 ट्रॅक्टर ट्रॉली आहेत. येथूनही शेतकरी हरियाणात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, शेतकरी पुढे जाण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी त्यांच्यावर ड्रोनमधून अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या.