टाडा ( दहशतवादी आणि विघटन विरोधी क्रियाकलाप कायदा) न्यायालयाने गुरुवारी 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी अब्दुल करीम टुंडा याची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली असल्याची बातमी समोर आली आहे.
अब्दुल करीम टुंडाची सर्व कलमांतून आणि सर्व कायद्यांतून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सीबीआयच्या फिर्यादीला टाडा, आयपीसी, रेल्वे कायदे, शस्त्रास्त्र कायदा, किंवा स्फोटक पदार्थ कायदा अंतर्गत कोणताही ठोस पुरावा न्यायालयासमोर सादर करता आला नाही. असे टुंडाचे वकील शफकत सुलतानी यांनी पत्रकारांना सांगितले.
अयोध्येत बाबरी पाडल्यानंतर १९९३ मध्ये देशभरात मुंबईसह सहा ठिकाणी ट्रेन्समध्ये सिरियल बॉम्ब ब्लास्ट झाले होते. यातील एक आरोपी अब्दुल करीम टुंडा याची अजमेरच्या टाडा कोर्टाने सुटका केली आहे. तर इतर दोन आरोपी इरफान आणि हमीदुद्दीन यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
1993 मध्ये कोटा, लखनऊ, कानपूर, हैदराबाद, सूरत आणि मुंबई या शहरांमधील ट्रेन्समध्ये बॉम्बस्फोट घडवून आणल्याबद्दल इरफान उर्फ पप्पू आणि हमीरुद्दीन या अन्य दोन आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत.
कोण आहे टुंडा ?
बॉम्ब ब्लास्टमध्ये सहभागी होण्यापूर्वी टुंडाने जालीस अन्सारीसोबत मुंबईत मुस्लीम समुदयासाठी काम करण्याच्या उद्देशानं ‘तंजीम इस्लाह उल मुस्लीमीन’ नावाची संस्था स्थापन केली होती. त्यानंतर ८०च्या दशकात पाकिस्तानी गुप्तचर एजन्सी आयएसआयच्या एजंट्सच्या माध्यमातून तो लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला. त्यानंतर तो एक कट्टरपंथी बनला.
सीबीआयने टुंडाला या स्फोटांचा मास्टरमाईंड ठरवले होते तसेच २०१३ मध्ये नेपाळच्या बॉर्डवरुन त्याला अटक झाली होती. टुंडा याच्यावर देशातील विविध ठिकाणी दहशतवादी कारवायांप्रकरणी खटले सुरु आहेत. टुंडा याने कथितरित्या तरुणांना भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी प्रशिक्षण दिल्याचा आरोपही त्याच्यावर आहे.