कर्नाटक विधानसभेच्या बाहेर ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्याच्या आरोपाखाली काँग्रेसचे राज्यसभा सदस्य सय्यद नसीर हुसेन यांच्या समर्थकाला ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी आज दिली.
राज्यसभा निवडणुकीत हुसेन यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद शफी नाशीपुडी, असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
व्यापारी आणि सय्यद नसीर हुसेनचा समर्थक मोहम्मद शफी नाशिपुडी याला ब्यादगी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सांगितले की, मोहम्मद शफी हा सय्यद नसीर हुसेनसोबत विधान सौधा पोलीस ठाण्यात उपस्थित होता. तसेच कथित पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा असलेल्या व्हिडीओमधील आवाजाचे विश्लेषण करण्यासाठी शफीच्या आवाजाचा नमुना घेण्यात आला होता, असेही पोलिसांनी सांगितले.
आदल्या दिवशी, कर्नाटक विधानसभेबाहेर सय्यद नसीर हुसेन यांच्या समर्थकांनी लावलेल्या कथित ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणांवर कारवाईची मागणी करत भाजप आमदारांनी विधान सौधा पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केले. विधानसभेत भाजप आमदारांनी ‘काँग्रेस सरकार खाली करा’, ‘हे सरकार कारवाई करण्यास सक्षम नाही, आम्हाला न्याय हवा आहे, दोषीला अटक करा, सरकार खाली करा’ अशा घोषणा दिल्या.
“24 तास झाले, सरकारने कोणतीही कारवाई सुरू केलेली नाही. आम्ही त्यांच्याकडून काय अपेक्षा करू शकतो,” असे भाजपचे आमदार आणि विरोधी पक्षनेते आर अशोक विधानसभेत म्हणाले.
या निषेधाला उत्तर देताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, सरकारने आवाजाचा अहवाल एफएसएलकडे पाठवला असून अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल. तसेच मी तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे, सरकार वचनबद्ध आहे, अहवाल आल्यावर आम्ही कोणालाही सोडणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
त्यानंतर भाजप आमदारांनी विधानसभेच्या वेलमध्ये येऊन जोरदार घोषणाबाजी केली. मात्र, बुधवारी सय्यद नसीर हुसेन यांनी त्यांच्या समर्थकांनी पाकिस्तान झिंदाबाद घोषणा दिल्याचा भाजपचा आरोप फेटाळून लावला.
“मी भाजपची निराशा समजू शकतो. दोन्ही पक्ष (भाजप-जेडीएस) एकत्र येऊन कर्नाटकमधून राज्यसभेची अतिरिक्त जागा मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असतानाही, त्यांचा पराभव झाला आहे,” असे हुसेन यांनी एएनआयला सांगितले.
“जर मी हे ऐकले असते तर मी त्याला तुरुंगात पाठवले असते. मी एका स्वातंत्र्यसैनिकाच्या कुटुंबातून आलो आहे. ज्या पक्षाने या देशासाठी लढा दिला आणि स्वातंत्र्य मिळवून दिले त्या पक्षाचे मी प्रतिनिधित्व करतो”, असेही नसीर हुसेन म्हणाले.