‘इंटेल’ कंपनीचे माजी अधिकारी अवतार सैनी यांचे अपघातात निधन झाले आहे. अवतार सैनी हे सायकलवरून जात असताना एका टॅक्सीने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात सैनी यांना मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही दुर्घटना नवी मुंबईमध्ये घडली आहे.
अवतार सैनी हे बुधवारी पहाटे सहाच्या सुमारास नेरूळ भागात सायकलिंग करत होते. त्यावेळी एका भरधाव टॅक्सीने मागून येत सैनी यांना जोरदार धडक दिली. यावेळी सायकल टॅक्सीमध्ये अडकल्याने सैनी देखील टॅक्सीसोबत काही अंतर फरफटत गेले. तसेच या अपघातानंतर आरोपी टॅक्सी चालकाने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
या अपघातानंतर अवतार सैनी यांना तातडीने जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, अपघातादरम्यान अवतार सैनी यांच्यासोबत असलेल्या इतर सायकल चालकांनी आरोपी टॅक्सी ड्रायव्हरला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर या टॅक्सी चालकावर निष्काळजीपणामुळे वाहन चालवल्याबद्दल आणि त्याच्या निष्काळजीपणामुळे जीव गेल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या आरोपी चालकाला अद्याप अटक केली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, अवतार सैनी यांनी भारतात इंटेलचे आर अँड डी सेंटर उभारणीसाठी मोठे योगदान दिले आहे. ते 1982 ते 2004 पर्यंत इंटेल इंडियाचे प्रमुख होते. यादरम्यान त्यांनी इंटेल 386, इंटेल 486 आणि पेंटियम यांच्यासमवेत कित्येक प्रोसेसर डिझाईन करण्यात योगदान दिले आहे.