लोकसभा जागावाटपासाठी महाविकास आघाडी म्हणजेच ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्या बैठका सुरू आहेत. तसेच महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला येत्या 2 दिवसात ठरणार असल्याची माहिती समोर येत आहे. अशातच मविआमध्ये ठाकरे गटाला जास्त जागा मिळणार असल्याचे स्पष्ट होताना दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाला 20 जागा, शरद पवार गटाला 10 जागा आणि काँग्रेसला 18 जागा मिळणार आहेत. तसेच महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांना तीन जागा सोडणार असल्याची माहिती समोर येत आहे.
ठाकरे गट 20 जागा लढवण्यावर ठाम असून शरद पवार गट दहा जागा लढवणार आहे. तसेच काँग्रेस 15 ते 18 जागा लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये 20-18-10 या फॉर्म्युल्यावर आत्तापर्यंत अंतिम चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या जागा आणि तिढा असलेल्या जागांवर अद्यापही चर्चा सुरू आहे.
दरम्यान, काल महाविकास आघाडीबाबत महत्त्वाची बैठक पार पडली. तसेच यापुढे जागावाटपाबाबत बैठक होणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. अशातच आज संजय राऊत हे शरद पवारांची भेट घेण्यासाठी त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी गेले आहेत. तसेच आज काँग्रेस शिष्टमंडळाची देखील शरद पवारांसोबत बैठक पार पडली असून या बैठकीला बाळासाहेब थोरात, नाना पटोले आणि पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते.