वकील गुणरत्न सदावर्ते हे सध्या मराठा आरक्षणाविरोधात आणि मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाविरोधात कायदेशीर लढाई लढताना दिसत आहेत. पेशाने वकील असणारे गुणरत्न सदावर्ते हे सतत कोणत्या ना कोणत्या विषयामुळे चर्चेत असतात. मात्र एका मोठ्या प्रकरणात त्यांना दिलासा मिळाला आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांना बार काउन्सिल ऑफ इंडियाने दिलासा दिला आहे. सदावर्ते यांची सनद दोन वर्षांसाठी निलंबित करण्याच्या मागणीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी हिंसक आंदोलन केले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी सदावर्तेंच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनादरम्यान, माध्यमांसमोर केलेली बेजबाबदार वक्तव्ये वकिलांसाठीचा पांढरा बँड परिधान वकिलांसाठीच्या असणाऱ्या आचारसंहितेचे केलेले उल्लंघन असे आरोप सदावर्तेंवर करण्यात आले होते. याबाबत पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
विधानसभेत मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. दरम्यान या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याची भूमिका वकील गुणरत्न सदावर्ते यांनी घेतली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती शुक्रे हे मराठा चळवळीतील कार्यकर्ते आहेत. गुणरत्न सदावर्ते यांनी कायमच मराठा आरक्षणाबाबत विरोधाची भूमिका घेतली आहे. मराठा आंदोलकांनी त्यांच्या गाड्यांची तोडफोड देखील केली होती. मात्र सदावर्ते हे यांनी भूमिका कायम ठेवली आहे. तसेच या अहवालाला, निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे त्यांनी सांगितले.