सध्या मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स हे चांगलेच चर्चेत आहेत. बिल गेट्स यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी नागपूरच्या प्रसिद्ध डॉली चायवाल्याची भेट घेतल्याचे दिसत आहे. तसेच त्यांनी डॉली चायवाल्याच्या चहाचा आस्वाद देखील घेतला. याचाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशातच काल (29 फेब्रुवारी) बिल गेट्स यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीबाबत बिल गेट्स यांनी सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्ता, महिलांच्या नेतृत्वाखालील विकास, कृषी क्षेत्रातील नवकल्पना, आरोग्य आणि हवामान अनुकूलता आणि भारताकडून जगाला शिकवणाऱ्या धड्यांसह इतर मुद्द्यांवर पंतप्रधानांशी चर्चा करण्यात आली.
बिल गेट्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. “नरेंद्र मोदींची भेट नेहमीच प्रेरणादायी असते आणि त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी भरपूर गोष्टी होत्या. आम्ही लोकहितासाठी AI बद्दल बोललो, महिलांच्या नेतृत्वाखालील विकास, कृषी, आरोग्य आणि हवामान अनुकूलतेमधील नवकल्पना आणि आपण भारताकडून जगाला कसे धडे घेऊ शकतो याबद्दल बोललो”, असे बिल गेट्स यांनी म्हटले आहे.
तसेच पंतप्रधान मोदींनी देखील या बैठकीला ‘अद्भुत’ म्हटले आहे. याबाबतची एक पोस्ट त्यांनी ट्विटरवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, ‘आपल्या ग्रहामध्ये सुधारणा करतील आणि जगभरातील लाखो लोकांना सक्षम करतील अशा क्षेत्रांवर चर्चा करणे नेहमीच आनंददायी असते.
दरम्यान, बिल गेट्स यांनी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचीही भेट घेतली होती. याशिवाय गेट्स मंगळवारी रात्री ओडिशामध्ये पोहोचले आणि बुधवारी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची भेट घेतली. त्यांनी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांसह भुवनेश्वरमधील एका झोपडपट्टीलाही भेट दिली आणि तेथील रहिवाशांच्या आरोग्याची माहिती घेतली.