ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या अडचणी वाढणार असल्याती शक्यता आहे. कारण राजन साळवी यांच्या पत्नी आणि भावाला एसीबीने नोटीस पाठवली आहे. तसेच आज राजन साळवींच्या पत्नी आणि भावाला जबाब नोंदवण्यासाठी रत्नागिरीच्या एसीबीच्या कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना या नोटीसद्वारे देण्यात आल्या आहेत.
एसीबीने अवैध मालमत्ता प्रकरणी दिलेल्या तक्रारीनंतर राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आज राजन साळवींच्या पत्नी अनुजा साळवी आणि भाऊ दिपक साळवी यांचा जबाब नोंदवला जाणार आहे.
आत्तापर्यंत राजन साळवींची एसीबीकडून सात ते आठ वेळा चौकशी झाली आहे. तसेच त्यांच्यावर या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. साळवींवर ऑक्टोबर 2009 ते 2 डिसेंबर 2022 पर्यंत बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. साळवींकडे तब्बल 3 कोटी 53 लाख इतकी बेहिशेबी मालमत्तेची रक्कम सापडल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
दरम्यान, अवैध मालमत्ता प्रकरणी राजन साळवींनी चौकशीसाठी अलिबाग येथील कार्यालयात सहा ते सातवेळी हजेरी लावली होती. साळवींसोबतच त्यांचा भाऊ, वहिणी, पुतण्या आणि स्वीय सहाय्यक यांना देखील नोटीस पाठवण्यात आली आहे.