हिमाचल प्रदेशमध्ये २७ फेब्रुवारीपासून राजकीय उलथापालथ सुरु आहे. कॉग्रेसचे ६ आमदार क्रॉस व्होटिंगमुळे अपात्र झाले आहेत. तर, भाजपाचे १५ आमदार निलंबित झाले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत हिमाचल प्रदेशमध्ये अनेक राजकीय घडामोडी होण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशमधील राजकीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, राज्य काँग्रेसच्या प्रमुख प्रतिभा सिंह यांनी भारतीय जनता पक्षाचे काम जुन्या पक्षापेक्षा चांगले आहे, असे विधान केले आहे.
“काँग्रेसमध्ये बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. एक खासदार म्हणून मी माझ्या मतदारसंघाला भेट देतो आणि स्थानिक लोकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. हे खरे आहे की भाजपचे काम आमच्यापेक्षा चांगले आहे,” असे आज एएनआयशी बोलताना हिमाचल काँग्रेसच्या प्रमुख प्रतिभा सिंह यांनी सांगितले. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्याकडे मी माझा संदेश पोहोचविला असून, संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असा संदेश दिला आहे असे प्रतिभा सिंग म्हणाल्या आहेत.
“पहिल्या दिवसापासून मी मुख्यमंत्र्यांना सांगत होते की, आपण संघटना मजबूत केली तरच आगामी निवडणुकीला सामोरे जाऊ शकतो. ही आमच्यासाठी खूप कठीण परिस्थिती आहे. ग्राउंड लेव्हलवर आम्हाला खूप अडचणी दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्देशानुसार भाजप बरेच काही करणार आहे,” त्या पुढे म्हणाल्या.
दरम्यान, २७ फेब्रुवारीला राज्यसभेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्यामुळे हिमाचल प्रदेश विधानसभेच्या अध्यक्षांनी काँग्रेसच्या ६ आमदारांना अपात्र ठरवले आहे. पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचे विधानसभा अध्यक्षांनी सांगितले आहे. तर अधिवेशनात गोंधळ घालून कामकाजात अडथळा आणल्यामुळे १५ भाजपा आमदारांचे निलंबन केले आहे. राज्यात राजकीय उलथापालथ सुरु असल्याने काँग्रेस आणि भाजपा दोघेही राज्यातील स्थितीवर लक्ष ठेवून आहेत.