मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या याचिका फेटाळण्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज सहमती दर्शवली आहे. त्यामुळे 7 मार्च रोजी यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
शिवसेनेच्या फुटीनंतर आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिंदे गटच खरी शिवसेना असल्याचा निर्णय दिला होता. त्याआधी केंद्रीय निवडणूक आयोगानेही शिंदे गटच शिवसेना असल्याचा निर्णय दिला होता. यानंतर राहुल नार्वेकरांच्या निर्णयाला विरोध करत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
ठाकरे गटाचे वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी लवकर सुनावणी घेण्याचा उल्लेख केल्यानंतर भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने हे प्रकरण 7 मार्च रोजी सुनावणीसाठी ठेवले आहे.
आता या याचिकेवर 7 मार्चला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे, असे सरन्यायाधीशांनी सांगितले आहे. तसेच आज 1 मार्च रोजी अनेक बाबी सूचीबद्ध केल्या आहेत, त्या यादीमध्ये ठाकरेंची याचिका समाविष्ट केली जाऊ शकत नसल्याचे सांगत खंडपीठ लवकर काम पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे, असेही सांगितले.