आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमध्ये 35,700 कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली आहे. पंतप्रधानांनी धनबाद जिल्ह्यातील सिंद्री येथे 8,900 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून विकसित केलेला हिंदुस्तान फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड (HURL) चा खत प्रकल्प राष्ट्राला समर्पित केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा अब की पार ४०० चा नारा दिला आहे. कारण जनतेला मोदींची गॅरंटी आहे असे, ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सभेला संबोधित करताना म्हणाले, ”४०० पारच्या घोषणा अशासाठी दिल्या जात आहेत, कारण देशाला मोदींच्या गॅरंटीवर गॅरंटी आहे. आज बांधण्यात आलेला मंडप थोडा लहान आहे. फक्त ५ टक्के लोक आत आहे आणि ९५ टक्के बाहेर, यासाठी मी तुमची माफी मागतो. ” यंदाच्या निवडणुकीत एनडीए ४०० जागा जिंकेल. कारण देशाला मोदींची गॅरंटी आहे, असे ते म्हणाले.
देशातील सकारात्मक विकासाचे शत्रू असल्याचे सांगत पंतप्रधानांनी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांवर जोरदार निशाणा साधला. मोदी म्हणाले,” काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष विकासाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. उत्तर कर्णपुरा येथील वीज प्रकल्पाची पायाभरणी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते मागील शतकाच्या अखेरीस झाली होती. त्यानंतर घोटाळेबाज सरकार काँग्रेस सत्तेत आली आणि हा प्रकल्प बंद पडला. २०१४ मध्ये मी या प्रकल्पाला पुनरुज्जीवित करण्याची हमी दिली. आज या वीज प्रकल्पामुळे अनेक घरे उजळली आहेत,” असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी झारखंडमध्ये 17,600 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणीही केली आहे. सोननगर आणि आंदल यांना जोडणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा प्रकल्पांमध्ये समावेश आहे. तोरी-शिवपूर पहिला आणि दुसरा रेल्वे मार्ग आणि बिराटोली-शिवपूर तिसरा रेल्वे मार्ग, मोहनपूर-हंसदिहा नवीन रेल्वे मार्ग, धनबाद-चंद्रपुरा रेल्वे मार्ग इत्यादींचा प्रकल्पांमध्ये समावेश आहे. या प्रकल्पांमुळे राज्यातील रेल्वे सेवेचा विस्तार होईल आणि या प्रदेशाचा सामाजिक-आर्थिक विकास होईल.