आज बेंगळुरूच्या व्हाईटफिल्डमधील लोकप्रिय रामेश्वरम कॅफेमध्ये मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात चार लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच या स्फोटानंतर तेथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
बेंगळुरूच्या राजाजीनगर येथील कॅफेच्या व्हाईटफिल्ड शाखेत दुपारी एकच्या सुमारास हा स्फोट झाला आहे. या स्फोटानंतर पोलीस दल आणि अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून तिथे मदत आणि बचावकार्य सुरू आहे.
पोलीस दल आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून ते स्फोटानंतरच्या परिणामांचे विश्लेषण करताना दिसले. तसेच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी परिसरात बंदोबस्त केला असून स्फोटात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या स्फोटाबाबत व्हाईटफिल्ड अग्निशमन केंद्राच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्हाला रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहोचलो आणि परिस्थितीचे विश्लेषण केले.”
दरम्यान, स्फोटाचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तसेच रामेश्वरम कॅफे हे लोकप्रिय हँगआउट्सपैकी एक आहे आणि सहसा दुपारच्या जेवणाच्या वेळेस तेथे खूप गर्दी असते. तर आता या कॅफेत झालेल्या स्फोटानंतर तेथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच सध्या या घटनेचा अधिक तपास केला जात आहे.