बेंगळुरूच्या राजाजीनगर येथील रामेश्वरम कॅफेमध्ये दुपारी एकच्या सुमारास स्फोट झाला आहे. या स्फोटात चार लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच या स्फोटानंतर पोलीस दल आणि अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून तिथे मदत आणि बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे नेते पीसी मोहन यांनी रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटाबद्दल चिंता व्यक्त केली आणि प्रशासनाला या घटनेची चौकशी करण्याची विनंती केली आहे.
ट्विटरवरील एका पोस्टमध्ये, बेंगळुरू सेंट्रलचे भाजप लोकसभा खासदार पीसी मोहन यांनी म्हटले आहे की, “बेंगळुरू सेंट्रल संसदीय मतदारसंघातील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या गूढ स्फोटाबद्दल ऐकून काळजी वाटली. माझ्या संवेदना पीडित व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. मी अधिकाऱ्यांना विनंती करतो की, या घटनेचा लवकरात लवकर तपास करा आणि सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करा.”
दरम्यान, बेंगळुरूचे पोलीस आयुक्त बी दयानंद हे पाहणीसाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच, बेंगळुरू दक्षिण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी सांगितले की, कॅफेच्या मालकाने त्यांना माहिती दिली की, एका ग्राहकाने कॅफेच्या आवारात एक बॅग सोडल्यानंतर हा स्फोट झाला आहे.
तेजस्वी सूर्या यांनी या घटनेबाबतचे एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “रामेश्वरम कॅफेचे मालक श्री नागराज यांच्याशी त्यांच्या कॅफेमध्ये झालेल्या स्फोटाबद्दल बोललो. त्यांनी मला सांगितले की हा स्फोट एका ग्राहकाने ठेवलेल्या बॅगमुळे झाला आहे, सिलिंडरच्या स्फोटामुळे नाही. तसेच या स्फोटात त्यांचा एक कर्मचारी जखमी झाला आहे, अशी माहिती मिळत आहे.”
दरम्यान, स्फोटाचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तसेच रामेश्वरम कॅफे हे लोकप्रिय हँगआउट्सपैकी एक आहे आणि सहसा दुपारच्या जेवणाच्या वेळेस तेथे खूप गर्दी असते. तर आता या कॅफेत झालेल्या स्फोटानंतर तेथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच सध्या या घटनेचा अधिक तपास केला जात आहे.